चहा आणि बरच काही | Cutting tea and gossips
एवढी थंडी असताना मित्राने चहा घ्यायला नकार दिल्यावर मला तो स्वत: वर अन्याय करतोय असं वाटे. चहा म्हणजे काय? आनंद!! एक कप भरुन. काही लोक घेतात काही या आनंदाला मुकतात, किंबवना त्यांना तो नको असतो. स्वत:ची मरगळ चहाच्या पत्ती बरोबर पाण्यात उकळून काढावी, दुध ओतलं की आयुष्याला नव्याने रंग फुटतील. जशी झाडांना नवीन पालवी फुटते! नवीन उमेद तयार होईल. जसा चवदार चहाचा सुगंध दरवळतो तसं आपणही दरवळाव. जीवनाचा आनंद कसा चहाच्या भरल्या कपा प्रमाणे भरभरून घ्यायला हवा, ताजा ताजा, चहाच्या प्रत्येक घोटा बरोबर आपणही ताजं व्हाव. स्वत:च्या रक्तात एकदा चहा उतरुद्या मग नव्यान उब मिळते, तरुणपणा जानवतो. काहीतरी हरवलेलं आठवत आणि आपण बोलायला लागतो. मग मित्रांबरोबर चहा घेत तासनतास गप्पा अगदी चहाची पत्ती जीभेला लागेपर्यंत!! कितीही प्रयत्न करा रिकाम्या कपात चहाचा एक थेंब तसाच राहतो आणि सोबतीला चहाच्या आठवणी. जश्या आयुष्यभराच्या आठवणी. आयुष्याचा चहा काहींना पोळलेला तर काहींना कडू, जास्तच गोड! ज्याचा त्याचा अनुभव वेगळा. काही फुंकून पितात तर काहींना उशीर झाल्याने थंड चहा प्यावा लागतो. काही चहाच्या फेसाचे बुडबुडे येतील इतपत काम करतात पण त्यांना साधा चहा घ्यायला देखील वेळ नसतो आणि ज्याचा चहाचा ग्लास रिकामा होणार नाही त्याच्या कपात आठवणींना जागा कशी असणार? आयुष्य कसं चहाच्या रंगा सारखं गढूळ असाव, प्रत्येक रंग हवा! नवनवीन नाती जोडावीत. भरपूर मित्र असावेत म्हणजे तुमचा चहाचा ग्लास जरी रिकामा झाला तरी आठवणींचा ग्लास कायम भरलेला राहील.
चहाचा रिकामा ग्लास
-अभिजीत हजारे.